अननस लागवडीबाबत माहिती
* अननस लागवड *
अननस ही ब्रोमेलिएसी कुलातील वनस्पती असून या तिचे शास्त्रीय नाव अननस कोमोसस (अननस सटिव्हस) आहे. ही वनस्पती मूळची ब्राझीलची आहे. मलेशिया, फिलीपीइन्स, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि भारतात अननस पिकवितात. भारतात केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, आसाम व त्रिपुरा या राज्यांत व्यापारी स्तरावर अननसाची लागवड केली जाते. महाराष्ट्रात कोकणामध्ये तुरळक प्रमाणात अननसाची लागवड होते. लागवड बियांपासून, तसेच झुडपाच्या वेगवेगळ्या भागांपासून (उदा., बुंध्यापासून निघालेली फूट, फळांचा शेंडा, इत्यादींपासून) करतात.
अननसाचे झाड केतकीच्या झाडासारखे असते. याची पाने तीन साडेतीन फूट लांब व दोन इंच रुंद असतात. पानेसहसा भुरकट हिरव्या रंगाची असतात. पण कधी कधी रंगी बेरंगीही दृष्टीस पडतात. या झाडाचे खोड फारच आंखूड असते. या झाडाच्या फळाची रचना फार लक्ष पुरविण्यासारखी मजेदार आहे. फळ लागण्यासारखे झाड झाले म्हणजे त्यांतून एक दांडा वर निघतो व त्या दांडयावर फार दाट अशी फुले येतात. या प्रत्येक फुलाचे स्वतंत्र फळ न होता ती चिकटून एकच मोठे फळ होते.फळ रसाळ, किरमिजी रंगाचे व चवीला आंबटगोड असते.
अननसाची पक्क फळे चकत्या करून खातात त्याच्या फळापासून मुरंबा, रस व शिर्का तयार करतात. त्याच्या ताज्या रसात ब्रोमेलिन नावाचा पाचक पदार्थ असतो. तसेच ‘क’ जीवनसत्त्वही असते. पिकलेले फळ शीतल, पाचक व मूत्रल असते. निर्यात करताना त्याचा गर हवाबंद डब्यांत भरून पाठवितात. अननसाच्या पानांपासून काढलेल्या धाग्यांपासून हातविणीचे कापड तयार करतात. हे कापड रेशमासारखे दिसते. धाग्यांपासून दोराही तयार करतात.
* जमीन व हवामान :
वाळू असलेली चिकण मातीची व लवकर पाणी चांगले निघून जाणारी जमीन फार उत्तम. निव्वळ वाळूच्या ठिकाणीही अननस शेती होते. जमिनींत चुन्याचे प्रमाण जास्त असलेलेतर उत्तम. जमीन जितकी कसदारव खत जितके उंची असतील तेवढे अननसाला चांगले. मात्र जमीन उत्तम निचर्याची असावी.
अननस लागवडीसाठी दमट वातावरण असणे गरजेचे असते. हवेत जितकी आर्द्रता जास्त तितके या पिकासाठी उत्तम.
* जाती :
अननस लागवडीसाठी क्यू, जायंट क्यू, क्वीन, मॉरिशिअस या जातींची निवड करावी. व्यापारी दृष्टीने लागवडीसाठी क्यू आणि क्वीन जातीची निवड फायदेशीर ठरते. या जातींची फळे साधारणतः १.५ ते २.५ किलो वजनाची असतात. तसेच सिलहट्टी व डाक्का या जातींचीही लागवड केली जाते. सिलहट्टी अथवा कुमला अननस लहान असून त्याला फार थोडे परंतु विलक्षण मोठे डोळे असतात व डाक्का अननस गुळगुळीत असून त्याला पांढरे डोळे असतात.
* अभिवृद्धी :
लागवड करण्यासाठी फुटवे, फळाचा मूळ दांडा व पाने यामध्ये वाढणारा फळाखालील कोंब आणि फळावरील शेंडे यापासून लागवड करतात.फळ तयार झाले म्हणजे मुख्य बुंध्याच्या आसपास जमिनींत असलेल्या बुंध्यापासून पुष्कळ अंकुर किंवा पिल्ले निघू लागतात. यांच्यापासून अननसाचे प्रजनन केले जाते. प्रजननाचा दुसरा मार्ग म्हणजे फळांवर आलेले पानांचे अंकुर व फळांतील बिया.
* लागवड :
अननसाची स्वतंत्र अशी लागवड सहसा करत नाहीत. नारळ सुपारी किंवा आंबे यांच्या बागेत अननस लावतात. लागवड करताना जमीन चांगली नांगरून, कुळवून ३० ते ४० सें.मी. खोल भुसभुशीत करावी. हेक्टरी २० टन शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. या पिकाची लागवड चरात केली जाते. त्यासाठी ३० सें.मी. खोलीचे तीन ते चार मीटर लांब चर तयार करावेत. दोन चरांतील अंतर ९० सें.मी. ठेवावे. चरातील दोन रांगांतील अंतर ६० सें. मी. ठेवावे. दोन झाडांतील अंतर २५ सें.मी. ठेवावे. विरळ लागवडीमध्ये हे अंतर ३० ते ४५ सें.मी.पर्यंत ठेवावे. लागवड करताना झाडाच्या आतील पोंग्यात माती जाणार नाही, याची काळजी घ्यावी. हे पीक बागायती असल्याने कोकणपट्टीत नारळाच्या बागेत लागवड करता येते. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांच्या कालावधीत लागवड करावी. लागवड करताना रोपे बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून लावावीत. अति पावसात लागवड करणे टाळावे.
* खत व्यवस्थापन :
प्रत्येक रोपाला १२ग्रॅम नत्र, ६ ग्रॅम स्फुरद, १२ग्रॅम पालाश या प्रमाणात २ ते ३ हप्त्यांत द्यावे. पहिला हप्ता लागवडीनंतर तीन महिन्यांनी द्यावा व शेवटचा हप्ता एक वर्षाच्या आत द्यावा.खतांचा हप्ता दिल्यानंतर लगेच भर देणे गरजेचे आहे. प्राणिज खत चांगले कुजल्या शिवाय रोपांजवळ घालू नये कारण त्यामुळेरोपांची वाढ खुंटते.खारावलेले मासे वाळवून केलेल्या खतदेत असला तर ते पावसाळयाच्या पूर्वीच जमिनींत पुरावे. जास्त खाते दिले तर रोपे मरतात. कुजलेला पाचोळा, कुजलेले शेण व वाळू यांनीभुसभुशित झालेल्या जमिनीत चांगल्या प्रकारचे अननस येते.सावलीच्या ठिकाणी अननस वाढविलेतर ते आकाराने मोठे होते परंतुअश्या अननसाला चव कमी असते.
कांही दिवसांनी रोपाचे स्थलांतर करणे फार चांगले असते. तीन चार वर्षांनी झाडे निकस झाल्यासारखी दिसू लागतात व असे झाल्यावर ती उपटून टाकून जमीन पुन्हा तयार करून त्या ठिकाणी नवीन रोप लावावे.पिकाला अधूनमधून भर द्यावी. खतांचा हप्ता दिल्यानंतर लगेच भर देणे गरजेचे आहे. चरांमध्ये वाळलेल्या गवताचे आच्छादन करावे.
* पाणी व्यावस्थापन :
हिवाळ्यात ८ ते १० दिवसांनी व उन्हाळ्यात सहा दिवसांनी जमिनीच्या मगदुरानुसार पाणीपुरवठा करावा. पावसाळ्यात चरांत पाणी साठणार नाही, याची काळजी घ्यावी.फळ तयार होत असतांना रोपांना वारंवार पाणी द्यावे लागते.
* काढणी व उत्पादन :
फुटवे वापरून लागवड केल्यास १८ते २२महिन्यांत फळे तयार होतात. फळाखालील कोंब व फळांवरील पानांच्या शेंड्यांचा वापर लागवडीसाठी केल्यास फळे अनुक्रमे २२ते २४महिन्यांत तयार होतात. खोडवा पीक तयार होण्यासाठी १२महिन्यांचा कालावधी लागतो. खोडव्याचे उत्पादन मुख्य पिकाच्या निम्मे येते. फळांच्या काढणीनंतर एक जोमदार फुटवा ठेवून बाकीचे फुटवे व मूळ झाड काढून टाकावे. खोडवा पिकास शिफारशीप्रमाणे खते द्यावीत. फळे पूर्ण तयार झाल्यावर, फळाच्या खालचे एक वा दोन ओळींतील डोळे पिवळे झाल्यानंतर फळे दांड्यासह कापून काढावीत. फळाला इजा करू नये. कधी कधीरोपाला फुले उशिरा आल्यामुळे हिवाळयांत फळे तयार होतात. अननस पिकण्यास उष्णता अवश्य पाहिजे असल्यामुळे हिवाळयांतील फळे चांगली पक्व हात नाहीत व त्यामुळे ती आंबट असतात.
फळ पूर्ण पिकण्यापूर्वी ते चांगल्या धारेच्या चाकूने देठांपासून कापतात. कांही अंतरावर फळे पाठवायचे असल्यास प्रत्येक फळ गवतांत किंवा कागदांत गुंडाळावे. दोन किंवा तीन फळांपेक्षा जास्त फळे एकत्र बांधू नयेत.
पानांपासून उत्तम वांक निघतो. फिलिपाईन् बेटात त्यापासून पिना नावाचे कापड तयार करतात; ते उत्तम मलमलीसारखे असते. उत्तर बंगालातील रंगपूर जिल्ह्यात चांभार जोडे शिवण्याचा धागा यापासून तयार करतात म्हणून तेथे या वांकाची फार मागणी आहे. गोव्याकडे या वांकाचे केलेले कंठे गळयात घालतात. या फळांत औषधी गुणधर्म असून त्यापासून मद्यार्क व शिर्का तयार करतात.
* औषधी गुणधर्म :
अननसाच्या पानांचा रस जंतविकारावर तर फळाचा रस दंतरोगावर उपाय म्हणून देतात. पानांचा ताजा रस साखर घालून उचकी लागल्यावर पाजतात. कच्च्या अननसाच्या रसाने गर्भपात होतो. कच्चा अननस खाल्ला तर स्तंभन पावलेला ऋतुस्त्राव चांगला होतो. फळांतल्या पांढर्याभागाचा रस साखर घालून पोटांत घेतला तर जुलाब होऊन जंत असतील तर पडून जातात. पक्व फळाचा रस काविळीवरही उपयोगी पडतो.
(वरिल सर्व माहिती राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्रे आणि कृषि विद्यापीठांनी केलेल्या शिफारसीवर आधारित आहे. प्रादेशिक हवामान व इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या शिफारसींची परिणामकारकता विविध भागात भिन्न असू शकते. शेतक-यांनी या माहितीचा वापर स्वत:च्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही परिणामांकरिता लेखक व प्रकाशक जबाबदार राहणार नाही.)
- डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर
(एम.एस.सी., पी.एच.डी. होर्टी. फळशास्त्र)
सहयोगी संशोधक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी


Comments
Post a Comment