आवळा प्रक्रियेतून यश'Success through the amla process'
आवळा प्रक्रियेतून यश
मराठवाडा व नगर जिल्ह्याच्या सीमेवरील सोनेसांगवी शिवारात अमोल बडे यांचा आवळा प्रक्रिया उद्योग नावारूपाला आला आहे. आवळा कॅण्डीची गुणवत्ता जोपासताना मार्केटिंगची थेट यंत्रणाही त्यांनी उभी केली आहे. दुष्काळी स्थितीत पाच हजार किलो कॅण्डी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवलेल्या या उद्योगाने अनेकांना रोजगारही दिला आहे.
| आवळा कॅण्डी |
मूळचे येळी गावचे (ता. पाथर्डी, जि. नगर) अमोल बडे यांनी पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्रात एम.ए., तर बारामती येथे बी.एड. पूर्ण केले. पैठणनजीक सोनेसांगवी शिवारात बडे व ढाकणे परिवाराची एकत्रित 60 एकर शेती आहे. सन 1972 च्या दुष्काळानंतर येथील उजाड माळरानावर कुसळाशिवाय काही नजरेत येत नव्हते. शेतीला पाण्याचा कोणताही आधार नव्हता. याच माळावर हिरवाई फुलविण्याचा अमोल यांनी निर्धार केला.
पाण्याची गरज भागविण्यासाठी शेतापासून 13 कि.मी. अंतरावरील जायकवाडी धरणातून पाणी आणण्याचा निर्णय पक्का केला. बॅंकेकडून 62 लाख रुपये कर्ज घेतले. दिवस-रात्र मेहनत करून मजुरांच्या मदतीने शेती लागवडीयोग्य केली. सन 2005 मध्ये आंबा, चिकू, डाळिंब व आवळा लागवड केली. ज्या माळरानावर कुसळाशिवाय काहीच दिसत नव्हते, तिथे पाणी, खते व सुयोग्य व्यवस्थापनातून बहरलेली फळशेती गावशिवारातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायक होती.
शेतीतून हळूहळू उत्पादन येणे सुरू झाले. सहा एकरांत आवळ्याच्या "नरेंद्र- सात' जातीच्या 600 झाडांपासून पाच टन उत्पादन मिळाले. बाजारपेठेत दर समाधानकारक नसल्याने आवळ्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात परभणी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी सुचविले. त्यादृष्टीने अमोल यांनी ठिकठिकाणी माहिती घेतली. याच विद्यापीठातील तज्ज्ञांकडून फळ प्रक्रियेचे प्रशिक्षणही घेतले. आवळा कॅण्डी बनविण्याच्या उद्योगाला त्यातून आकार दिला.
आवळा प्रक्रिया उद्योगाचे टप्पे
भांडवल
स्वभांडवलावर उद्योग सुरू करताना ड्रायर व पॅकिंग मशिनसाठी एक लाख 30 हजार रुपये, पाक तयार करण्यासाठी ड्रमसाठी 30 हजार रु., पोशाख, हातमोजे तसेच इतर साहित्यासाठी 20 हजार रु., प्रयोगशाळा उभारणीसाठी 20 हजार रु., असे एकूण दोन लाख रुपये; तर इमारत बांधकामासाठी दोन लाख रुपये अशा चार लाख रुपयांची भांडवली गुंतवणूक केली.
कॅण्डी निर्मिती
आवळा कॅण्डी निर्मितीत ठरावीक कालावधीच्या विविध टप्प्यांत आवळा उकळणे, साखरेच्या पाकात भिजू देणे, स्वच्छ पाण्याने धुऊन ड्रायरमध्ये सुकविणे, त्यानंतर तत्काळ आकर्षक पॅकिंग करणे व मार्केटमध्ये पाठविणे अशा विविध कृती कराव्या लागतात. प्रक्रिया उद्योगात शंभर टक्के स्वच्छता ठेवण्यावर भर असतो. प्रक्रिया कालावधी - दरवर्षी जानेवारी ते मार्च. दररोज सुमारे दोनशे किलो आवळा कॅण्डी तयार केली जाते.
आवळा स्क्वॅशचीही विक्री
| 'Success through the amla process' |
आवळा कॅण्डी बनविताना प्रक्रिया केलेला पाक व किसलेला आवळा यांचे मिश्रण करून आवळा स्क्वॅश बनविण्यात येते. एक लिटर स्क्वॅश 100 रुपये दराने विकला जातो. पित्तावर उपयुक्त म्हणून त्याला चांगली मागणी आली आहे.
प्रक्रिया उद्योगातून रोजगार
अमोल यांना प्रताप रावसाहेब ढाकणे यांचे सहकार्य आहे. आवळा प्रक्रियेच्या तीन महिन्यांच्या काळात दहा लोकांच्या हातांना काम मिळाले आहे. यात महिलांचाही सहभाग आहे. शेती व उद्योगनिर्मितीत दोन कुटुंबांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे. मजूर कुटुंबांसाठी शेतीवरच राहण्याची व्यवस्था आहे.
थेट मार्केटिंगचा फंडा
आवळा कॅण्डी मुख्य वितरकाला दिल्यास पैसे कमी मिळायचे. अमोल यांनी या पद्धतीत बदल करताना कॅण्डीचे थेट मार्केटिंग केले. गुणवत्ता चांगली जोपासल्याने कॅण्डीला चांगली मागणी आहे. अमोल यांना जाणवले, की 50 व 100 ग्रॅम पॅकिंगमधून कॅण्डीला बाजारपेठेत चांगला उठाव मिळतो.'Success through the amla process'
| 'Success through the amla process' |
आपण जर पाच टन उत्पादन केले व सुमारे एक हजार दुकानांमधून ती विक्रीस ठेवली व प्रत्येकाने पाच किलो कॅण्डी विकली तरी पाच टन कॅण्डी खपते. त्याची किंमत (एमआरपी) 300 रुपये असली तरी वितरकांना ती 240 रुपयांना विकायची. म्हणजे प्रत्येक दुकानदाराला किलोमागे 60 रुपये फायदा होऊ शकतो व तो अधिक कॅण्डी विकू शकतो. या विक्री पद्धतीत यश आल्याचे अमोल म्हणाले.
बडे यांच्या उद्योगाचे अर्थकारण
1) एक हजार किलो कॅण्डीनिर्मिती खर्च - साखर - 49 हजार, मजूर - 15 हजार, पॅकिंग - 20 हजार, आवळा - 20 हजार, मशिनरीचा घसारा चार हजार, इतर एक हजार असा मिळून एक लाख दहा हजार रु.
2) 240 रुपये प्रति किलोप्रमाणे एक हजार किलो विक्रीतून दोन लाख 40 हजार रुपये मिळतात.
3) मागील वर्षी दोन हजार किलो कॅण्डी विक्रीतून चार लाख 80 हजार रुपयांची उलाढाल झाली.
4) सध्या आपल्याच शेतातील आवळा वापरला जातो; मात्र गरजेनुसार तो बाहेरूनही घ्यावा लागेल.
उद्योग विस्ताराच्या उंबरठ्यावर
सारंग स्पायसेस ऍण्ड ऍग्रो फूड्स उद्योग असे अमोल यांच्या उद्योगाचे नाव आहे, त्यांच्याकडे सुमारे 45 एकरांवर केसर आंबा आहे. त्यापासून मॅंगो पल्प निर्मितीचा मानस आहे. त्या भागात डोंगरभागात सीताफळाची झाडे आहेत. काही वेळा दर नसल्याने शेतकऱ्यांना सीताफळ फेकून देण्याची वेळ येते. अशा वेळी पल्प निर्मिती फायदेशीर ठरेल असे अमोल यांना वाटते. दुष्काळी स्थितीमुळे प्रकल्पासाठी काही वेळ जावा लागेल; मात्र आवश्यक यंत्रसामग्री व प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे.
अमोल बडे यांच्या टिप्स
1) कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी कर्ज उभारणी, गुंतवणूक, शासकीय प्रोत्साहन, अनुदान यासाठी प्रकल्प अहवाल तयार करावा.
2) प्रकल्पाची रूपरेषा, एकूण खर्च, तांत्रिक बाबी, बाजारपेठ, विक्री व्यवस्था या बाबींना महत्त्व द्यावे.
3) उलाढाल, नफा, रोख उत्पन्न यांचा ताळमेळ पाहावा.
4) उद्योगाचा आर्थिक ताळेबंद आवश्यक, नफा- तोट्याचे गणित त्यावरून कळते.
संपर्क : अमोल बडे : 9822607000
माहिती संदर्भ : अॅग्रोवन

Comments
Post a Comment